गेल्या काही दिवसांपासून इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षाने मध्यपूर्वेत तणावाचे वातावरण निर्माण केले आहे. या संघर्षाचा कळस तब्बल गुरुवारी (१९ जून २०२५) दिसून आला, जेव्हा इराणने दक्षिण इस्रायलमधील बीरशेबा शहरातील सोरोक्का मेडिकल सेंटर या मोठ्या रुग्णालयावर क्षेपणास्त्राने हल्ला केला. या घटनेनंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी तीव्र प्रतिक्रिया देत इराणला “मोठी किंमत” मोजावी लागेल, असा इशारा दिला आहे.
इराण हल्ल्याचा तपशील आणि परिणाम
गुरुवारी सकाळी, इराणने इस्रायलवर मोठ्या प्रमाणावर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केला. या हल्ल्यात दक्षिण इस्रायलमधील सोरोक्का रुग्णालयावर एक क्षेपणास्त्र आदळले. या रुग्णालयात १,००० हून अधिक बेड असून, दक्षिण इस्रायलमधील सुमारे १० लाख लोकांना आरोग्य सेवा पुरवली जाते. या हल्ल्यात सुमारे ४० ते ४७ लोक जखमी झाले असून, रुग्णालयाच्या जुन्या सर्जरी इमारतीला सर्वाधिक हानी झाली. सुदैवाने, या इमारतीत सध्या कोणतेही रुग्ण नव्हते, कारण काही दिवसांपूर्वीच ती रिकामी करण्यात आली होती.
हल्ल्यानंतर रुग्णालयात आपत्कालीन परिस्थिती जाहीर करण्यात आली आणि इतर सर्व रुग्णसेवा तात्पुरत्या बंद करण्यात आल्या. इस्रायली मीडिया आणि सामाजिक माध्यमांवर रुग्णालयातील फुटलेल्या खिडक्या, धुराचे लोट आणि घाबरलेले नागरिक यांचे दृश्य प्रसारित झाले.
इराणची भूमिका आणि स्पष्टीकरण
इराणने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असली, तरी त्यांनी स्पष्ट केले की, त्यांचा मुख्य उद्देश सौरोक्का रुग्णालय नव्हते, तर जवळील इजरायली लष्करी आणि गुप्तचर तळ (IDF C4I) आणि गॅव-यम टेक्नोलॉजी पार्कमधील लष्करी कॅम्प होते. मात्र, क्षेपणास्त्राचे लक्ष्य चुकल्याने रुग्णालयावर हल्ला झाला, असे इराणच्या IRNA या सरकारी वृत्तसंस्थेने सांगितले.
नेतान्याहूंची तीव्र प्रतिक्रिया
पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. त्यांनी म्हटले, “इराणच्या दहशतवादी सत्ताधाऱ्यांनी सौरोक्का रुग्णालय आणि देशाच्या मध्यभागातील नागरिकांवर क्षेपणास्त्र डागले. आम्ही तेहरानच्या अत्याचाऱ्यांकडून पूर्ण किंमत वसूल करू”. नेतान्याहू यांनी देशवासियांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आणि सांगितले की, “आम्ही आमचे उद्दिष्ट साधू आणि शत्रूंना जबरदस्त प्रत्युत्तर देऊ”.
इस्रायलची प्रत्युत्तरात्मक कारवाई
या हल्ल्यानंतर इस्रायलनेही इराणमधील अराक येथील जड पाण्याचा अणु रिऍक्टर आणि नतान्झ परिसरातील आण्विक शस्त्र विकास केंद्रावर हवाई हल्ले केले. या कारवाईमुळे इराणच्या आण्विक कार्यक्रमावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया आणि तणाव
या संघर्षामुळे संपूर्ण मध्यपूर्वेत तणाव वाढला आहे. अमेरिकेचे वरिष्ठ अधिकारी इराणवर संभाव्य हल्ल्याची तयारी करत आहेत, तर रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी मध्यस्थीची तयारी दर्शवली आहे. इराणच्या समर्थक गटांनी मात्र या संघर्षात फारशी सक्रियता दाखवलेली नाही, असे निरीक्षण नोंदवले जात आहे
https://www.instagram.com/policernews