बेंगळुरूमध्ये वायुदलाच्या अधिकाऱ्याला सार्वजनिक ठिकाणी मारहाण झाली. त्यांच्या पत्नीला शिवीगाळ करण्यात आली. वाचा संपूर्ण घटना आणि पोलिसांच्या प्रतिक्रियांची माहिती.
बेंगळुरूच्या सीव्ही रमण नगर येथील डीआरडीओ वसाहतीतून एअरपोर्टकडे निघालेल्या विंग कमांडर बोस आणि त्यांच्या पत्नी स्क्वॉड्रन लीडर मधुमिता यांच्यावर काही अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. या हल्ल्यात विंग कमांडर यांच्या चेहऱ्यावर व डोक्यावर गंभीर दुखापत झाली आहे.
https://www.instagram.com/reel/DIsJJn-S3nn/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
विंग कमांडर बोस यांनी रक्तबंबाळ अवस्थेत कारमधून एक व्हिडिओ शेअर करत ही धक्कादायक माहिती दिली. त्यांनी सांगितले, “एका दुचाकीस्वाराने आमच्या कारसमोर गाडी आडवी लावली आणि कन्नड भाषेत शिवीगाळ सुरू केली. कारवर ‘DRDO’ स्टिकर पाहून त्यांनी मला आणि पत्नीला उद्देशून अपशब्द वापरले. मी गाडीतून खाली उतरलो, तेव्हा त्या व्यक्तीने माझ्या कपाळावर चावीने मारले.”
बोस पुढे म्हणाले, “माझ्यावर दगडानेही हल्ला करण्यात आला. कारच्या काचेवर मारताना तो दगड माझ्या डोक्यावर आदळला. मी मोठ्याने ओरडून सांगत होतो की, आम्ही तुमच्यासाठी देशसेवा करतो आणि तुम्ही आमच्यावर असे वागता?”
या घटनेनंतर दोघं जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये गेले. मात्र, तक्रार करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असे त्यांनी व्हिडिओमध्ये सांगितले. बोस म्हणाले, “कर्नाटकात हे काय सुरू आहे? कायदा आणि सुव्यवस्था जर आमच्यासाठी नाही, तर उद्या आम्हालाच प्रतिकार करावा लागेल. देवच आम्हाला संयम देतोय.”
ही घटना नेमकी कशी घडली याबाबत अजून स्पष्टता नाही. पोलिसांनी सांगितले की, अद्याप अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही, मात्र त्यांनी अधिकाऱ्याच्या पत्नीशी संपर्क साधला आहे आणि चौकशी सुरू केली आहे.
भारतीय वायुदलाच्या अधिकाऱ्याशी सार्वजनिक ठिकाणी झालेली ही वागणूक धक्कादायक आहे. यावर लवकरात लवकर कारवाई होणे आवश्यक आहे. भारतीय वायुदलाकडून अद्याप या घटनेवर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.