मीरारोड (ठाणे): शहरात वाढणारे ध्वनी आणि वायू प्रदूषण तसेच अनधिकृत बांधकामांच्या जाचाला कंटाळून मीरारोडमधील पूनम विहार परिसरातील रहिवाशांनी एक ऐतिहासिक आणि धाडसी निर्णय घेतला आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर या भागातील ‘इंद्रप्रस्थ’ गृहसंकुलातील रहिवाशांनी आपल्या सोसायटीच्या प्रवेशद्वारावरच राजकारण्यांना प्रवेश बंदीचा फलक लावला आहे. वारंवार तक्रारी करूनही समस्या सुटत नसल्याने हा आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे.
मीरारोडच्या पूनम विहार भागात बापा सीताराम मंदिर आणि सभागृहाच्या मागे इंद्रप्रस्थ ए, बी व सी आणि इंद्रप्रस्थ डी, ई, एफ तसेच संस्कृती ही मोठी गृहसंकुले आहेत. येथील रहिवासी गेल्या अनेक वर्षांपासून विविध समस्यांशी झुंज देत आहेत. यामध्ये प्रामुख्याने अनधिकृत हॉलमधील लग्न समारंभ, रात्री-अपरात्री होणारी फटाक्यांची आतषबाजी आणि रस्त्यावरील बेकायदा पार्किंग यांचा समावेश आहे.
रहिवाशांच्या मते, मंदिरात होणारे भजन-कीर्तन इथपर्यंत परिस्थिती ठीक होती. मात्र, मंदिराच्या परिसरात अनधिकृत हॉल बांधून तिथे व्यावसायिक तत्वावर लग्न आणि इतर कार्यक्रम सुरू करण्यात आले. हे कार्यक्रम पहाटेपर्यंत चालतात, ज्यामुळे प्रचंड ध्वनी प्रदूषण होते. लाऊडस्पीकर आणि बँड-बाजाच्या आवाजामुळे वृद्ध, रुग्ण आणि विशेषतः विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर मोठा परिणाम होत आहे.
केवळ ध्वनी प्रदूषणच नाही, तर वायू प्रदूषणामुळेही येथील नागरिक त्रस्त आहेत. लग्न समारंभावेळी केल्या जाणाऱ्या मोठ्या आतषबाजीमुळे परिसरात धुराचे लोट पसरतात. आधीच सिमेंटच्या धुळीमुळे हवेची गुणवत्ता खालावलेली असताना, या फटाक्यांच्या धुरामुळे श्वसनाचे विकार वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. शुद्ध हवा मिळणे आता येथील नागरिकांसाठी दुरापास्त झाले आहे.
रहिवाशांनी अनेकदा स्थानिक पोलीस ठाण्यात आणि महापालिकेत या अनधिकृत हॉलविरोधात तक्रारी केल्या आहेत. मात्र, पोलिसांची कारवाई केवळ नावालाच असते. पोलीस येतात, हॉल चालकांना समज देतात आणि निघून जातात. ठोस कारवाई होत नसल्याने रहिवाशांमध्ये संतापाची लाट आहे. हा हॉल एका स्थानिक राजकीय नेत्याशी संबंधित असल्यानेच प्रशासन याकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
इंद्रप्रस्थ ए, बी व सी सोसायटीच्या प्रवेशद्वारावर लावलेल्या फलकावर स्पष्टपणे लिहिले आहे की, “सततच्या ध्वनी आणि वायू प्रदूषणाच्या समस्येमुळे कोणताही राजकीय नेता किंवा पक्षाचा कार्यकर्ता निवडणूक प्रचारासाठी सोसायटीच्या आत येऊ शकत नाही.” सोसायटीचे अध्यक्ष प्रवीणभाई यांनी सांगितले की, गेल्या चार वर्षांपासून आम्ही या नरकयातना सोसत आहोत. पत्रव्यवहार करूनही काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने आम्ही हा निर्णय घेतला आहे.
इंद्रप्रस्थ डी, ई, एफ सोसायटीच्या अध्यक्षा मीनाक्षी वाळणेकर यांनीही या भावनांना दुजोरा दिला. महिलांना चालण्यासाठी रस्ता उरलेला नाही, सगळीकडे बेकायदा गाड्या लावल्या जातात आणि रात्रीच्या गोंधळामुळे झोप घेणे कठीण झाले आहे, असे त्यांनी नमूद केले.
महापालिका निवडणुकीचे वारे वाहत असताना रहिवाशांनी घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय पक्षांचे धाबे दणाणले आहेत. हा परिसर एका मोठ्या पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो, मात्र आता तेथील हक्काच्या मतदारांनीच नेत्यांना दारात येण्यास मनाई केल्याने उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे.
Follow Us On
Read Also

