7 Feb 2026, Sat
Breaking

हजारो रुग्णांना मृत्यूच्या दारातून परत आणणारे विख्यात न्युरोसर्जन डॉ. चंद्रशेखर पाखमोडे यांचे हृदयविकाराने निधन

डॉ. चंद्रशेखर पाखमोडे

नागपूर: आपल्या विलक्षण शस्त्रक्रिया कौशल्याने हजारो रुग्णांना मृत्यूच्या दारातून सुखरूप परत आणणारे आणि नागपूरच्या वैद्यकीय क्षेत्रातील एक आधारस्तंभ मानले जाणारे, विख्यात न्युरोसर्जन व ‘न्युरॉन हॉस्पिटल’चे संचालक चंद्रशेखर पाखमोडे (५५) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दु:खद निधन झाले; ही घटना बुधवार, ३१ डिसेंबर रोजी सकाळी घडली. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण विदर्भासह वैद्यकीय विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

पहाटे हृदयविकाराचा झटका

मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे भंडारा जिल्ह्यातील लाखनी (सलोटी) येथील रहिवासी असलेले डॉ. पाखमोडे सध्या नागपूरच्या रामदासपेठ येथील ‘हॅपी हाईट्स’ येथे वास्तव्यास होते. बुधवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास त्यांना घरातच हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीने धंतोली येथील त्यांच्या स्वतःच्या ‘न्युरॉन हॉस्पिटल’मध्ये नेण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमने त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र उपचारादरम्यान सकाळी ८ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

वैद्यकीय प्रवासातील दीपस्तंभ

डॉ. चंद्रशेखर पाखमोडे यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी होता. त्यांनी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून (जीएमसी) आपले एमबीबीएस आणि त्यानंतर एम.सी.एच. (न्युरोसर्जरी) चे शिक्षण पूर्ण केले. पुढील उच्च शिक्षणासाठी त्यांनी मुंबईच्या प्रसिद्ध केईएम रुग्णालयातून अनुभव घेतला. नागपूरच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पाच वर्षे सेवा दिल्यानंतर, मार्च २०१४ मध्ये त्यांनी सहकारी डॉ. प्रमोद गिरी यांच्या मदतीने धंतोली येथे ‘न्युरॉन हॉस्पिटल’ची स्थापना केली. अल्पावधीतच हे रुग्णालय न्युरोलॉजी क्षेत्रातील एक महत्त्वाचे केंद्र बनले.

संवेदनशील आणि रुग्णप्रिय व्यक्तिमत्व

डॉ. पाखमोडे केवळ एक तज्ज्ञ डॉक्टरच नव्हते, तर ते अत्यंत शांत, संयमी आणि संवदेनशील स्वभावाचे होते. रुग्णांशी संवाद साधताना त्यांच्या चेहऱ्यावरील शांतता आणि आत्मविश्वास रुग्णांना अर्धा आजार विसरायला लावत असे. मेंदू आणि मणक्याच्या अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात त्यांचा हातखंडा होता. गोरगरीब रुग्णांना मदत करण्यासाठी ते नेहमी पुढाकार घेत असत.

मान्यवरांकडून श्रद्धांजली

डॉ. पाखमोडे यांच्या निधनाचे वृत्त समजताच नागपूरच्या वैद्यकीय क्षेत्रात शोककळा पसरली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त केला आहे. “डॉ. पाखमोडे यांच्या रूपाने आपण एक अभ्यासू, तज्ज्ञ आणि संवेदनशील डॉक्टर गमावला आहे. नागपूरच्या आरोग्य सेवेतील त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील,” अशा शब्दांत गडकरी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

त्यांच्या पश्चात आई, पत्नी डॉ. मनीषा (जे जे हॉस्पिटल, नागपूर येथे कार्यरत), मुलगा डॉ. अद्वैत, मुलगी अनन्या आणि मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज, ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता नागपूर येथील मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


Follow Us On

Instagram

X Account

Facebook

Read Also

महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *