मुंबईसारख्या बहुभाषिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध शहरात मराठी भाषेचा मुद्दा नेहमीच संवेदनशील राहिला आहे. अलीकडेच, मुंबईतील प्रसिद्ध उद्योजक सुशील केडिया यांनी सोशल मीडियावर “मी मराठी शिकणार नाही” अशी पोस्ट शेअर केली आणि त्याबरोबरच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली. या विधानानंतर राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले. मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली, सोशल मीडियावरून आणि प्रत्यक्ष आंदोलनातून केडिया यांना प्रत्युत्तर दिलं. अखेर, या दबावाखाली सुशील केडिया यांनी आपली चूक मान्य करत राज ठाकरे आणि मराठी समाजाची माफी मागितली.
सुशील केडिया हे मुंबईत गेल्या ३० वर्षांपासून राहतात. त्यांनी एक्स (माजी ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत म्हटलं, “राज ठाकरे, याची नोंद घ्या की, मी मुंबईत गेल्या ३० वर्षांपासून राहतो. पण मला मराठी व्यवस्थित येत नाही. आता तुमचे यासंदर्भातले बेफाम गैरवर्तन पाहता मी हा पणच केला आहे की, जोपर्यंत तुमच्यासारखे लोक मराठी माणसाचे कैवारी म्हणून वावरत आहेत, तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही, काय करायचंय बोला.” या पोस्टमुळे मराठी समाजात संतापाची लाट उसळली आणि मनसेच्या नेत्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी केडिया यांच्यावर जोरदार टीका केली.
मनसेच्या कार्यकर्त्यांनी केडिया यांच्या कार्यालयावर आंदोलन केले, नारळफेक केली आणि तोडफोडही केली. सोशल मीडियावरही केडिया यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया उमटल्या. मराठी अस्मिता आणि भाषेच्या मुद्द्यावर मनसेने नेहमीच ठाम भूमिका घेतली आहे. त्यामुळे या प्रकरणाने राजकीय आणि सामाजिक पातळीवर मोठा गहजब निर्माण केला.
या सर्व घडामोडींनंतर सुशील केडिया यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत आपली चूक मान्य केली. त्यांनी म्हटलं, “माझं ट्वीट चुकीच्या मानसिक अवस्थेत, दबावाखाली आणि तणावात लिहिलं गेलं होतं. आणि आता त्याचा विपर्यास आणि चुकीचा अर्थ लावला जात आहे. काही लोकांना वाद निर्माण करून त्यातून फायदाच मिळवायचा आहे. मराठी न कळणाऱ्या लोकांवर झालेल्या हिंसाचारामुळे मी मानसिक तणावाखाली होतो, आणि त्यामुळे मी अति प्रतिक्रिया दिली. आता मला जाणवतंय की ती प्रतिक्रिया मागे घ्यायला हवी होती. मी माझं वक्तव्य मागे घेतो आणि सर्व मराठी समाजाची माफी मागतो.”
केडिया यांनी पुढे स्पष्ट केलं की, “मी सातपेक्षा जास्त भारतीय भाषा शिकल्या आहेत. पण मराठी बोलताना भीती वाटते की, एखादा शब्द चुकला तर त्याचा विपर्यास होईल. राज ठाकरे यांच्या भूमिकेचं मी कौतुक करतो. माझ्याकडून ओव्हररिअॅक्शन झाली, याची मला जाणीव झाली आहे. मराठी शिकण्यासाठी भीतीऐवजी प्रोत्साहन द्या. माझी चूक स्वीकारतो आणि माफी मागतो.”
या प्रकरणामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठी अस्मिता, स्थानिक भाषा आणि संस्कृती या मुद्द्यांवर चर्चा सुरू झाली आहे. मुंबईसारख्या महानगरात विविध भाषिक लोक राहत असले तरी, स्थानिक भाषेला आणि संस्कृतीला सन्मान देणे अपेक्षित आहे, हा संदेश या प्रकरणातून अधोरेखित झाला. मनसेसारख्या पक्षांनी मराठीच्या मुद्द्यावर घेतलेली आक्रमक भूमिका आणि समाजातील सामान्य नागरिकांनी दाखवलेली प्रतिक्रिया, यामुळेच केडिया यांना आपली भूमिका बदलावी लागली.
https://www.instagram.com/policernews
https://policernews.com/wp-admin/post.php?post=707&action=edit