8 Feb 2026, Sun
Breaking

नेपाळमध्ये काळजाचा ठोका चुकला! ५५ प्रवाशांना घेऊन उतरणारे विमान धावपट्टीवरून घसरले; सर्व प्रवासी सुरक्षित

नेपाळमध्ये धावपट्टीवरून विमान घसरले

काठमांडू: नेपाळमधील भद्रपूर विमानतळावर शुक्रवारी रात्री एक मोठी दुर्घटना होता-होता राहिली. काठमांडूवरून ५५ प्रवाशांना घेऊन येणारे बुद्धा एअरचे एक विमान लँडिंगदरम्यान धावपट्टीवरून घसरले. या घटनेमुळे विमानातील प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, सुदैवाने वैमानिकाने दाखवलेले प्रसंगावधान आणि नशिबाची साथ यामुळे सर्व ५५ प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुखरूप आहेत. या घटनेमुळे नेपाळच्या हवाई सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, बुद्धा एअरचे ‘फ्लाइट ९०१’ (विमान क्रमांक 9N-AMF) हे विमान शुक्रवारी रात्री ८:२३ वाजता नेपाळची राजधानी काठमांडूवरून भद्रपूरसाठी रवाना झाले होते. रात्री ९:०८ च्या सुमारास विमान भद्रपूर विमानतळावर पोहोचले. विमान धावपट्टीवर उतरत असताना (टचडाऊन झाल्यानंतर) तांत्रिक बिघाडामुळे ते वैमानिकाच्या नियंत्रणाबाहेर गेले. विमान धावपट्टीवर स्थिर होण्याऐवजी वेगात पुढे सरकले आणि धावपट्टी सोडून सुमारे २०० मीटर अंतरावर असलेल्या गवताळ भागात जाऊन अडकले. अचानक लागलेल्या या धक्क्यामुळे आणि विमानाच्या आवाजामुळे प्रवाशांचा काळजाचा ठोका चुकला होता.

प्रवाशांचा जीव भांड्यात पडला

विमान धावपट्टीवरून खाली उतरताच एअरपोर्ट अथॉरिटी आणि सुरक्षा यंत्रणांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळाचे प्रवक्ते रिंजी शेरपा यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानात ५१ प्रवासी आणि ४ क्रू मेंबर्स असे एकूण ५५ जण होते. अपघात घडताच विमानातील वीज पुरवठा खंडित झाला होता, ज्यामुळे आतमध्ये अंधार पसरला आणि गोंधळ उडाला. मात्र, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सर्व प्रवाशांना तातडीने आणि सुरक्षितपणे विमानातून बाहेर काढले. या घटनेत कोणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सर्व प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवल्यानंतर त्यांचा जीव भांड्यात पडला.

तांत्रिक पथकाकडून तपास सुरू

या घटनेनंतर भद्रपूर विमानतळावरील विमान वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. झापा जिल्ह्याचे सीडीओ वसुदेव घिमिरे यांनी या घटनेची पुष्टी केली असून सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, तांत्रिक बिघाडामुळे ही घटना घडली असून विमान सध्या गवताळ भागात अडकलेले आहे. काठमांडूहून एक विशेष तांत्रिक पथक भद्रपूरला रवाना झाले असून, ते विमानाची तपासणी करतील. विमानाचे किरकोळ नुकसान झाले असून तपासणी पूर्ण झाल्यानंतरच त्याला पुन्हा उड्डाणासाठी परवानगी दिली जाईल.

नेपाळमधील विमान अपघातांची मालिका

नेपाळमध्ये गेल्या काही वर्षांत विमान अपघातांचे प्रमाण वाढले आहे. येथील भौगोलिक परिस्थिती, डोंगराळ भाग आणि लहरी हवामान यामुळे अनेकदा लँडिंग आणि टेक-ऑफ दरम्यान अडचणी येतात. यापूर्वी जुलै २०२४ मध्ये काठमांडू विमानतळावर सौर्य एअरलाईन्सचे विमान कोसळून १८ जणांचा मृत्यू झाला होता. तसेच २०२३ मध्ये पोखरा येथे झालेल्या यती एअरलाईन्सच्या अपघातात ७२ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. अशा पार्श्वभूमीवर, काल रात्री झालेली दुर्घटना सुदैवाने टळली असून मोठी जीवितहानी टळली आहे.

सध्या विमानतळ प्रशासन या घटनेचा सविस्तर अहवाल तयार करत असून बुद्धा एअरच्या या विमानातील तांत्रिक बिघाड नेमका कशामुळे झाला, याची चौकशी सुरू आहे.


Follow Us On

Instagram

X Account

Facebook

Read Also

महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *