वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी संबंधांवर भाष्य करताना एक खळबळजनक विधान केले आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या माझ्यावर फारसे खूश नाहीत,” असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. भारताकडून रशियाकडून घेतल्या जाणाऱ्या तेलावर अमेरिकेने लादलेल्या जादा टॅरिफमुळे (करांमुळे) मोदी नाराज असल्याचे ट्रम्प यांनी सुचित केले आहे.
हाऊस जीओपी (House GOP) सदस्यांच्या एका बैठकीत बोलताना ट्रम्प यांनी भारत-अमेरिका संबंधांवर प्रकाश टाकला. ट्रम्प यांनी दावा केला की, भारताने रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरू ठेवल्याने अमेरिकेने भारतावर ५० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लादले आहेत. यामध्ये प्रामुख्याने रशियन तेलाच्या खरेदीवर २५ टक्के टॅरिफचा समावेश आहे.
ट्रम्प म्हणाले, “माझे मोदींशी खूप चांगले संबंध आहेत. पण ते सध्या माझ्यावर खुश नाहीत कारण त्यांना आता खूप टॅरिफ भरावे लागत आहेत. मात्र, भारताने आता रशियाकडून होणारी तेल आयात मोठ्या प्रमाणात कमी केली आहे, हे देखील महत्त्वाचे आहे.”
व्यापारी वादाव्यतिरिक्त, ट्रम्प यांनी भारत आणि अमेरिका यांच्यातील संरक्षण कराराचाही उल्लेख केला. गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ‘अपाचे हेलिकॉप्टर’ (Apache Helicopters) कराराबाबत त्यांनी माहिती दिली. भारत गेल्या अनेक वर्षांपासून या हेलिकॉप्टरची प्रतीक्षा करत होता. आता अमेरिका भारताला ६८ अपाचे हेलिकॉप्टर पुरवणार असून, या प्रक्रियेतील विलंब दूर करण्यात आला असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.
आपल्या खास शैलीत बोलताना ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींच्या भेटीचा किस्साही सांगितला. ते म्हणाले की, “पंतप्रधान मोदी मला भेटायला आले आणि म्हणाले, ‘सर, मी तुम्हाला भेटू शकतो का?’ मी म्हणालो हो नक्कीच.” या विधानातून ट्रम्प यांनी दोन्ही नेत्यांमधील वैयक्तिक मैत्री अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला, तरीही व्यापाराच्या बाबतीत ते आपल्या ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणावर ठाम असल्याचे दिसून आले.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या या विधानामुळे जागतिक राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. एकीकडे भारत आणि अमेरिका संरक्षण क्षेत्रात जवळ येत असताना, दुसरीकडे रशियाकडून तेल आयातीच्या मुद्द्यावरून अमेरिकेने घेतलेली कठोर भूमिका भारतासाठी आव्हानात्मक ठरू शकते. ट्रम्प यांच्या ‘टॅरिफ वॉर’मुळे भारतीय बाजारपेठेवर आणि इंधन दरांवर काय परिणाम होतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Follow Us On
Read Also

