पुणे: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर केवळ प्रवासासाठीच व्हावा, तो मनोरंजनाचा अड्डा बनू नये, या उद्देशाने पुणे महानगर परिवहन महामंडळाने (PMPML) एक धाडसी पाऊल उचलले आहे. पीएमपीच्या बसेसमध्ये, बस थांब्यांवर किंवा महामंडळाच्या आवारात विनापरवाना मोबाईल चित्रीकरण करणे आता महागात पडणार आहे. विशेषतः सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि ड्युटीवर असताना रील्स बनवणाऱ्या कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा मोठा फटका बसणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पीएमपी बसमधील अनेक व्हिडिओ आणि रील्स व्हायरल होत आहेत. काही व्हिडिओमध्ये महिला प्रवाशांच्या खासगीपणाचा (Privacy) भंग होत असल्याचे, तर काही ठिकाणी कर्मचाऱ्यांनी गणवेशात असतानाच नियमांचे उल्लंघन करून चित्रीकरण केल्याचे निदर्शनास आले. नुकतेच पुण्याचे प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामे यांनाही याप्रकरणी कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. प्रवाशांच्या तक्रारी आणि सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन पीएमपी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांनी हे कडक निर्बंध लागू केले आहेत.
पीएमपी प्रशासनाने सर्व डेपो मॅनेजर्सना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की:
१. प्रवाशांसाठी: बसेसमध्ये इतर प्रवाशांना त्रास होईल किंवा त्यांच्या संमतीशिवाय त्यांचे चित्रीकरण केल्यास संबंधित व्यक्तीवर थेट गुन्हा दाखल केला जाईल.
२. कर्मचाऱ्यांसाठी: चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांनी ड्युटीवर असताना मोबाईल वापरणे, फोटो काढणे किंवा गणवेशात रील्स बनवणे पूर्णपणे बंद करावे. उल्लंघन केल्यास निलंबनासह कायदेशीर कारवाई केली जाईल.
३. व्यावसायिक चित्रीकरण: कोणत्याही प्रकारचे व्यावसायिक किंवा प्रायोजित चित्रीकरण करायचे असल्यास प्रशासनाची लेखी परवानगी आणि विहित शुल्क भरणे अनिवार्य आहे.
पीएमपी बसमध्ये अनेकदा महाविद्यालयीन तरुण-तरुणी आणि इन्फ्लुएन्सर्स स्टंट करताना किंवा मोठ्या आवाजात गाणी लावून व्हिडिओ शूट करताना दिसतात. यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. तसेच, चालकांचे लक्ष विचलित झाल्यामुळे अपघाताची शक्यताही वाढते. या सर्वांवर नियंत्रण मिळवण्यासाठी ‘झिरो टॉलरन्स’ धोरण स्वीकारण्यात आले आहे.
पीएमपीने स्पष्ट केले आहे की, आता केवळ समज देऊन सोडले जाणार नाही. जर कोणी बसमध्ये विनापरवाना रील बनवताना किंवा चित्रीकरण करताना आढळले, तर बस थेट जवळच्या पोलीस ठाण्यात नेऊन संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला जाईल. प्रवाशांनीही अशा प्रकारच्या कृत्यांची तक्रार करण्यासाठी पीएमपीच्या हेल्पलाइन नंबरचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Follow Us On
Read Also

