नंदूरबार: सातपुड्यातील घाटमार्गावरील अत्यंत खडतर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. अक्कलकुवा खाई ते गोरजाबारी या तीन किलोमीटर रस्त्यावर वाहनधारकांसाठी मृत्यूचा अड्डा बनलेला आहे. या खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात प्रशासनाचा उदासीन दृष्टिकोन असल्याने एका गुराख्याने आपल्या मेहनतीने रस्त्यावरील खड्डे भरण्याचा चंग बांधला आहे. रायसिंग दोहऱ्या वळवी या ५५ वर्षीय गुराख्याने गेल्या १५ दिवसांपासून हातात फावडी आणि कुदळ घेऊन रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम सुरू केले आहे.
सातपुड्यातील दुर्गम भागातील खाई ते गोरजाबारी या घाट सेक्शनचा तीन किलोमीटर रस्ता एकाबाजूने दरी आणि दुसऱ्या बाजूने उभा डोंगर असल्याने अतिशय खडतर आहे. गेल्या काही महिन्यांत या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. खड्डे चुकविताना वाहन थेट दरीत कोसळण्याची शक्यता आहे. या भागात दररोज गुरे चारणाऱ्या रायसिंग वळवी यांच्या नजरेतून प्रवाशांची होणारी फरफट सुटत नव्हती.
रायसिंग वळवी यांनी १५ दिवसांपूर्वी हाती कुदळ, फावडा घेत खड्डे बुजविण्यास प्रारंभ केला आहे. दररोज ते मार्गावर होईल तेवढे खड्डे भरण्याचे काम करत आहेत. डोंगरातून माती कोरून आणत तिला आधी स्वच्छ करून ते खड्डे बुजवित आहेत. हा भराव निघू नये, यासाठी ते योग्य पद्धतीने बारीक खडीही त्यात टाकतात.
या मार्गावर काही ठिकाणी डोंगरातून कोसळलेल्या दरडींचे ढीगही पडून आहेत. हे ढीगही सरकावण्याचा त्यांचा मानस आहे. सध्या त्यांच्या खड्डे बुजविण्याच्या समाजोपयोगी कृतीमुळे खाई, गोरजाबारी, ओहवा, वाडीखाडी खाडीपाडा, सावरखाडीपाडा, सरपंच पाडा, गोरजाबारीपाडा येथील वाहनधारकांना प्रवास सुखकर होत आहे. त्यामुळेच सातपुड्यातला हा ‘दशरथ मांझी’ चर्चेचा विषय झाला आहे.
या भागातील वाहनधारकांनी रायसिंग वळवी यांच्या उपक्रमाचे कौतुक केले आहे. त्यांच्या कामामुळे वाहनधारकांचा प्रवास सुरक्षित झाला आहे. लोकांच्या मते, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अशा सामान्य नागरिकांना आपल्या जबाबदारी घ्यावी लागत आहे.
Follow Us On
Instagram :
X Account :
Read Also

