ठाणे: ठाणे महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली आहे. ठाण्यात युती करून मैदानात उतरलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला प्रशासकीय पातळीवर मोठा धक्का बसला आहे. छाननी प्रक्रियेदरम्यान या दोन्ही पक्षांच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद ठरवला आहे. यामुळे निवडणुकीच्या प्रत्यक्ष रणधुमाळीपूर्वीच हे दोन उमेदवार स्पर्धेतून बाद झाले असून, विरोधकांनी आता निवडणूक यंत्रणेवरच संशयाची सुई धरली आहे.
कोणाचे अर्ज ठरले अवैध?
ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील प्रभाग क्रमांक १६, १७ आणि १८ मध्ये ही नाट्यमय घडामोड घडली. मिळालेल्या माहितीनुसार, उद्धवसेनेचे अरविंद चव्हाण आणि मनसेच्या उमेदवार प्राची घाडगे यांचे उमेदवारी अर्ज तांत्रिक त्रुटींचे कारण देत फेटाळून लावण्यात आले आहेत. केवळ मनसे-उद्धवसेनाच नव्हे, तर वंचित बहुजन आघाडीलाही याचा फटका बसला असून त्यांचे उमेदवार संदीप खरात यांचा अर्जही अवैध ठरवण्यात आला आहे. एकाच वेळी विरोधी पक्षांच्या तीन उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
निवडणूक अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप
अर्ज बाद झाल्यानंतर मनसे आणि उद्धव सेनेचे नेते आक्रमक झाले आहेत. त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी प्रशासनावर थेट प्रहार केला. त्यांनी आरोप केला की, “सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना झुकते माप दिले जात आहे. शिंदे सेनेच्या उमेदवार एकता भोईर यांच्या प्रतिज्ञापत्रात शेवटचे पान आणि स्वाक्षरी नसतानाही त्यांचा अर्ज वैध कसा ठरला?” असा संतप्त सवाल त्यांनी विचारला आहे.
अविनाश जाधव पुढे म्हणाले की, “उमेदवार प्राची घाडगे या वेळेत उपस्थित असूनही त्यांना जाणीवपूर्वक बाहेर थांबवून ठेवण्यात आले आणि त्यानंतर त्यांचा अर्ज बाद करण्यात आला. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार अर्ज सकाळी ११ वाजता डिस्प्ले करणे अपेक्षित होते, परंतु ते दुपारी साडेतीन वाजता करण्यात आले. हा सर्व प्रकार सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली सुरू आहे.”
प्रशासकीय पारदर्शकतेवर प्रश्न
या संपूर्ण प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली मॅडम यांच्या भूमिकेवर विरोधकांनी संशय व्यक्त केला आहे. छाननी सुरू असताना अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांचे तिथे येणे आणि फाईल्सची ने-आण होणे, यावरून विरोधकांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. “आम्ही आधीच आंदोलन केले होते की निवडणूक अधिकारी निष्पक्ष असावेत, पण आजच्या घटनेने आमची भीती खरी ठरली आहे,” असेही जाधव यांनी नमूद केले.
राजकीय समीकरणे बदलणार?
ठाण्यात मनसे आणि उद्धवसेनेने या निवडणुकीत एकमेकांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, वागळे इस्टेट सारख्या महत्त्वाच्या प्रभागांतून उमेदवार बाद झाल्याने युतीच्या रणनीतीला खिंडार पडले आहे. याचा थेट फायदा सत्ताधारी पक्षाला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने आता हे पक्ष न्यायालयात धाव घेणार की अन्य काही पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निवडणूक आयोगाकडून या आरोपांवर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, मात्र ठाण्यातील या प्रकरणामुळे आगामी निवडणुकांमध्ये प्रशासकीय पारदर्शकता हा मोठा मुद्दा ठरण्याची चिन्हे आहेत.
Follow Us On
Read Also

